सोलापुर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप सातत्याने करत आहे. त्यांची ही मागणी हास्यास्पद आहे, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे या प्रकरणांमधे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पंढरपूर येथे आले होते. तेव्हा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
मुंबई येथील अंबानींच्या घराच्या बाहेर ठेवलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू हे प्रमुख प्रश्न राज्यातील प्रसार माध्यमे मांडत आहेत. यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित पत्रासारख्या बातम्या पेरल्या जात आहेत का? याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून नक्कीच शाहनिशा केली जाईल, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. गृहमंत्री अनिल देशमुख चांगले काम करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे वक्तव्यही पाटील यांनी केले.






