दोन निहंग शिखांचा पोलिसांवर हल्ला; चकमकीत दोघांचा मृत्यू

चंदीगड – दोन निहंग शीख नांदेडमधील एका कारसेवकाची हत्या केल्यानंतर पळून गेले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी तरणतारणमधील पोलिसांना दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्या दोन निहंग शिखांना पकडण्यासाठी पंजाब पोलीस गेले होते. त्यावेळी त्या शिखांनी पोलिसांवरच तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर झालेल्या चकमकीत त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

महताब सिंह आणि गुरदेव सिंह अशी चकमकीत मृत्यू झालेल्या निंहग शिखांची नावे आहेत. महाराष्ट्रातील नांदेडमधील एका हत्येप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत होते. नांदेडमध्ये एका कारसेवकाची हत्या करून हे दोघे पळून आल्याची माहिती तरणतारण पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांनी दिली होती, असे तरणतारणच्या पोलीस उपनिराक्षकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा शोध घेण्यात येत होता. मोबाईल लोकेशनवरून ते सुरसिंग गावात असल्याची माहिती मिळाली. त्यामुसार त्यांनी अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्या दोघांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींवर तलावरीने हल्ला चढवला. त्यात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांच्या करावाईत त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांनी केलेल्या हल्ल्यात बलविंदर सिंह आणि नरिंदर सिंह हे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here