पोलीस प्रशासनाचे सट्टा व मटका व्यवसायाबद्दल उदारमतवादी धोरण
शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – शहराच्या मध्यवर्ती भागात खुलेआम सट्टा व्यवसाय थाटणारे नंदुरबार जिल्हातील शहादा हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर असावे. गुटखा,जुगार, अफूची शेती असे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर शहरात सुरू असून पोलीस प्रशासन मात्र हे सारे हताशपणे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शहर अवैध धंद्यासाठी नावारूपाला येत असून त्यात भर म्हणून आता सट्टा व्यावसायिकांनीदेखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
प्रसारमाध्यमांनी स्टिंग ऑपरेशन करून पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे केले आहे. तरी देखील निगरगट्ट पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैध व्यवसायिकांना संरक्षण देण्याचा प्रकार सर्रास करत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जवळच असलेल्या टपऱ्यांमध्ये सट्टा व मटका घेण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहेत. म्हणजेच ज्या महामानवाने कायद्याचे शस्त्र आपल्या हाती दिले त्यांची देखील तमा न बाळगता त्यांच्याच पुतळ्याजवळ काळे धंदे जोरात सुरू आहे. हा शहराचा मध्यवर्ती भाग असून जवळच प्रांत कार्यालय व इतर शासकीय कार्यालय असल्यामुळे पोलीस यंत्रणा या चौकात नेहमीच कार्यरत असते असे असून देखील या सट्टा बाजाराकडे त्यांचे लक्ष कसे जात नाही?
कानून के हाथ लंबे होते है हा डायलॉग सिनेमात आपण नेहमी ऐकतो, पण या डायलॉगचा प्रत्यय इथं येत नाही. कडक शिस्तीचे व गुन्हेगारांना सळो की पळो करणारे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत देखील याच परिसरात गस्त घालतात व सारे उघड्या डोळ्यांनी बघत असतात. आपण महाराष्ट्रात आहोत की गुन्हेगारीसाठी प्रसिध्द असलेल्या उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील जिल्ह्यात? असा प्रश्न शहरातील राहिवाशांना आता पडू लागला आहे.
कदाचित सट्टा व्यवसायिकाकडून लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असावा? म्हणून की काय या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा प्रसारमाध्यमांकडे कानाडोळा करून अवैध सट्टा व्यवसायिकांना अभय दिले जात आहे. गुन्हेगारीला आळा बसावा व अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून स्वतंत्र गुप्तचर विभाग कार्यरत असतो. त्याच प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग देखील कार्यरत असतो असे असताना हे सारे कोरोना काळात सुट्टीवर तर गेले नाहीत ना? हा देखील प्रश्न निर्माण होतो.
अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात स्थानिक पोलीस प्रशासन तसेच जिल्हा पोलिस यंत्रणा असमर्थ ठरली असून कारवाईसाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून सट्टा व्यवसायाची पाळेमुळे उपटून टाकावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करीत आहे. तरी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतांना अशा अवैध सट्टा व्यावसायिकांवर कारवाई होणार का? हाच प्रश्न आ वासून उभा आहे. सतत बातम्या प्रसारित करून देखील कारवाई मात्र होतांना दिसत नाही. पोलीसांसमोर मात्र सट्टा व्यावसायिकांवर कारवाईचे खुले आव्हान उभे ठाकले आहे.






