तरुणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला

आग्रा – जिल्ह्यातील हरीपर्वत परिसरात एका तरुणीने आपल्या प्रियकरावर ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ला करणारी मुलगी आणि मृत युवक हे दोघंही प्रियकर प्रेयसी होते आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, या तरुणाचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत ठरल्यानं नाराज तरुणीनं हे पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आरोपी प्रेयसी अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही.

ही घटना हरीपर्वत ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहाणाऱ्या या कपलमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. यानंतर नाराज प्रेयसी सोनमनं झोपेत असलेल्या देवेंद्र या आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड ओतून त्याठिकाणाहून पळ काढला. निधनाआधी देवेंद्रनं सांगितलं, की जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तिनं मला चहा बनवून दिला. यानंतर मी झोपी गेलो. याचवेळी तिनं माझ्यावर अ‍ॅसिड ओतलं आणि ती पळून गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेंद्र हा कासगंज जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, आरोपी प्रेयसी सोनमा औरैया येथील राहाणारी होती. देवेंद्र एका पॅथोलॉजीवर काम करायचा तर सोनम एका रुग्णालयात नर्स होती. हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाले. यानंतर सोनमनं देवेंद्रवर अॅसिड हल्ला केला. उपचारासाठी देवेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपाचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here