मेरठ – सध्या कोरोना विषाणूच्या साथीनं सगळ्यांना इतकं घाबरवलं आहे की, कोरोनापासून वाचण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता सुचतील ते उपाय केले जात आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यातदेखील एक अजब उपाय राबवण्यात येत आहे. इथे चक्क पोलीस चौकीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल आणि चंदनाचा लेप लावला जात आहे. या पोलीस ठाण्यात कोरोनासाठी पाळण्यात येणाऱ्या सुरक्षा नियमांमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नौचंडी पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रेमचंद शर्मा यांनी हे नियम तयार केले आहेत. पत्रकार पीयूष राय यांनी तिथला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये एसएचओ शर्मा पोलिस ठाण्यात गंगाजलाची बाटली घेऊन प्रवेश करताना दिसतात. त्यानंतर गंगाजलच्या अनेक बाटल्या त्यांच्या टेबलवर ठेवल्या जात असल्याचे दिसते. नंतर इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल शिंपडून चंदनाचा टिळा लावला जातो, तसंच अनेकांना गंगाजलाची बाटली भेट दिली जात असल्याचंही या व्हिडिओत दिसते.
SHO Prem Chand Sharma in UP's Meerut has been “purifying” visitors with Gangajal while chanting a "sanitization mantra". He has been giving a bottle of Gangajal as a gift to visitors at Nauchandi police station ahead of Holi. pic.twitter.com/J3atuaeCgr
— Piyush Rai (@Benarasiyaa) March 28, 2021
एसएचओ शर्मा हे पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीचं शुद्धीकरण करण्यासाठी गंगाजल वापरतात; गंगाजल शिंपडत असताना ते एक मंत्र म्हणतात, असं राय यांनी म्हटलं आहे. तर एसएचओ शर्मा यांनी येणाऱ्या लोकांना शांत करण्याच्या उद्देशानं हा उपाय करत असल्याचं म्हटलं आहे. गंगाजल आणि चंदन वापरण्यास सुरुवात केल्यापासून स्टेशनवर येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, लोक शांतपणे त्यांच्या समस्या मांडत असल्याचं दिसून आलं आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असा दावा शर्मा यांनी केला आहे.






