लोकप्रतिनिधी, पोलिसांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा केला दाखल

वाशिम – लोकांना मते मांडण्यासाठी सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम मिळाले आहे परंतु या माध्यमातून व्हायरल केलेल्या गोष्टी क्षणभरात जगात पोहचतात. यातून अनेकदा एखाद्याची बदनामी होण्याचाही प्रसंग उद्‌भवतो. त्यामुळे सोशल मिडीयावर व्यक्त होताना सांभाळूनच व्यक्त होणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा अनेकांचा संयम सुटतो. अशाच एका प्रकरणी पोलीस आणि लोकप्रतिनिधींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वाशिम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार,वाशिम शहर यांच्यासह लोकप्रतिनिधी अशा सहा जणांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार वाशिम येथे समोर आला आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार हरीश सारडा यांनी केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारडा हे वाशिम नगरपालिकेत नगरसेवक होते. काहीकाळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदही त्यांनी भूषवले आहे. मात्र, सातत्याने पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हकालपट्टी केली होती. आता सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सारडा यांच्याविरोधात वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या कोविड-१९ काळात वाशिम पोलीस दलातील दोनशेहून अधिक अधिकारी व अंमलदारांना करोना संसर्ग झाला आहे. तरीही वाशिम पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे समर्थपणे जनतेचे रक्षण करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पोलीसांची प्रतिमा जनमानसात कोणी मलीन करण्याचा प्रयत्न केला तर, त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, पण कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदार हा जर बेकायदेशीरपणे काम करीत असेल तर, त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here