कोरोना लॉकडाऊन : सर्वसामान्यांना दिवसा बंदी, तर चोरांना रात्री सुवर्णसंधी

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून शहादा शहरात दिवसा पोलीस यंत्रणेकडून कडक बंदोबस्त करून लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडून दंडदेखील वसूल करण्यात येत आहे परंतु लॉकडाऊनमुळे रहदारी व लोकांचा वावर कमी झाल्याने, रात्री चोरांना मोकळीक मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाजीमार्केटमधील काल रात्री तब्बल 5 दुकाने चोरट्यांनी फोडलीत. आधीच कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . संचारबंदीमुळे व्यवसायात मंदी आल्याने व्यापारी आधीच त्रस्त आहे . त्यातच शहरात एकाच रात्रीतून ५ दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी आता चांगलाच धास्तावला आहे .

दिवसा पोलीस यंत्रणा चोख कर्तव्य बजावत असून रात्री मात्र चोरांवर वचक बसवण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. रात्री मुख्य बाजारपेठ परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. एकाच रात्री पाच दुकानांचे कुलुप तोडून रोकड व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिवसा बंदी तर चोरांना रात्री सुवर्णसंधी असा प्रकार शहरात सुरू असल्याचे कोपरखळी शहरवासिय आता प्रशासनाला मारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here