छेडछाडीला विरोध करणाऱ्या दोन्ही बहिणींना हॉकी स्टिकने केली मारहाण

इटावा (उत्तर प्रदेश) – महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षिततेचा दावा सरकारकडून केला जात असतानाच, उत्तर प्रदेशातील इटावामध्ये गुंड, रोडरोमिओ मोकाट सुटले आहेत. भर्थना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडरोमिओंनी दोन सख्ख्या बहिणींची छेड काढली. मुलींनी छेडछाडीला विरोध केल्यानंतर त्या दोघींना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन बहिणी घरातून रात्री आठ वाजता काही वस्तू आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी तेथील मोहल्ल्यात काही जण मुलींना पाहून शेरेबाजी करू लागले. मुलींनी याबाबत आपल्या भावाला फोनवरून माहिती दिली. पीडितेचा लहान भाऊ तिथे पोहोचला. त्याने जाब विचारल्यानंतर त्यांच्या लहान भावाला मारहाण केली.

आपल्या भावाला मारहाण होत असताना, त्याला वाचवण्यासाठी मुलींनी हस्तक्षेप केला. त्यांनाही गुंडांनी हॉकी स्टिकने मारहाण केली. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. लहान बहिणीलाही जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती भर्थना पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीने ट्वीटरवर पोस्ट टाकली असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून शिक्षा करण्यात यावी, असेही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

भर्थना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची दखल प्रसारमाध्यमांनी घेतल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here