औरंगाबादमध्ये तरुणीला पळवून नेऊन दोन दिवस डांबून ठेवले

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – वाळूज महानगरातील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला ओळखीच्या दोघांनी दुचाकीवरून पळवून नेवून दोन दिवस डांबून ठेवल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. विकी अशोक जगधने व अर्जुन मुरलीधर धनवे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की येथील महाविद्यालयीन तरुणी बजाजनगरातील एका महाविद्यालयात बीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. चार दिवसांपूर्वी ती महाविद्यालयात जात असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन धनवेने तिला मोबाईल नंबर मागितला होता. तिने नकार दिल्यानंतर अर्जुनने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. बदनामीच्या भीतीने या तरुणीने घरच्यांना काहीच माहिती दिली नाही.

दरम्यान, शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने तरुणी सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर पायी घरी जात असताना सिडको महानगरातील पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीवरुन आलेल्या विकी जगधणे व अर्जुन धनवे यांनी तिला अडवले. तिला घरी बसण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतरही, भावाशी बोलणे झाल्याचे खोटेच सांगितले. तरुणीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने या दोघांनी गाडी पंढरपूर येथील पेट्रोल पंपावर नेली. तेथेच त्यांनी तिला शिविगाळ करून मारहाण केली. तसेच, तिला एका घरामध्ये डांबून ठेवले. या तरुणीने अर्जुनशी गोड बोलून, त्याला घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर अर्जुनने रविवारी तिला वाळूज येथे सोडून दिले. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशानेच अपहरण करण्यात आले होते, असे या तरुणीने पोलिसांना सांगितले. तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, सहाय्यक फौजदार जायभाये पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here