पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – आयटी कंपनीत नोकरी करणारी महिला घरी जाण्यासाठी ओला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, या महिलेचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडीयावर टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ ते ३० मार्च दरम्यान धायरी परिसरातील एका लॉजवर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका आयटी कंपनीत नोकरी करते. तर, आरोपी हा ओला कॅबवर चालक आहे. ४ मार्च रोजी महिलेने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी हा कॅब घेऊन आला. महिला मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी महिलेला तहान लागली होती. तिने पाणी मागितले असता आरोपीने महिलेला गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर महिलेला गुंगी येऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी तिला धायरी येथील गोकुळ लॉज येथे घेऊन गेला. तिथे महिलेचे कपडे काढून मोबाइलद्वारे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन महिलेवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.






