मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने आईवडिलांनी केला पोटच्या मुलाचा खून

arrested

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका तरुणाने कुटुंबीयांच्या विरोधात जावून प्रेम विवाह केल्याच्या रागातून त्याच्या आई-वडिलांनी त्याचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तरुणाच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रताप कुमावत (रा. कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

निलेश कुमावत याने प्रेमसंबंधातून विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय ३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी विवाह केला होता. त्यांच्या या प्रेम विवाहास आई अलका प्रताप कुमावत (वय ५६) आणि वडील प्रताप सहादू कुमावत (वय ६४) यांचा विरोध होता. दरम्यान, १३ मार्च २०२० रोजी निलेश कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन न करता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत हिने चाळीसगाव न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने याची दखल घेत कलम १५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत हिने दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here