तीन कोटींच्या विम्याच्या हव्यासापोटी महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं

चैन्नई – तामिळनाडूमध्ये पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन कोटींचा विमा मिळवण्यासाठी पत्नीने आपल्या चुलत भावाच्या मदतीने पतीची हत्या केली. पतीचा मृत्यू हा कारचे जळीतकांड असल्याचा बनाव तिने रचला. विशेष म्हणजे कर्ज चुकवण्यासाठी माझी हत्या कर आणि विम्याचे पैसे मिळव, अशी योजना खुद्द पतीनेच आखली होती, असा दावाही तिने केला आहे.

तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील पेरुन्दुरई गावात राहणाऱ्या 62 वर्षीय रंगराजन यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाला. रंगराजन हे पॉवरलूम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी ते एका अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर कोइम्बतूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारांनंतर रंगराजन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांची 55 वर्षीय पत्नी ज्योती मणी आणि तिचा 41 वर्षीय चुलत भाऊ राजा यांनी डिस्चार्जनंतरच्या प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांना ओम्नी कारने घरी नेले जात होते. मात्र त्याआधीच त्यांनी रंगराजन यांच्या हत्येचा कट रचला होता. या गाडीतच जाळून ज्योती आणि राजा यांनी रंगराजनची हत्या केली.

दरम्यान, पेरुमानल्लूरजवळ आमच्या गाडीला आग लागली. मी आणि राजा गाडीतून कसेबसे बाहेर पडून जीव वाचवण्यात यशस्वी ठरलो, मात्र रंगराजन यांचे प्राण आम्हाला वाचवता आले नाहीत, आणि गाडीत त्यांचा जळून मृत्यू झाला, असा बनाव ज्योतीने रचला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा ज्योती आणि राजा यांचे जबाब परस्पर विरोधी आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कसून चौकशी केली असता ज्योतीने विम्याच्या पैशांच्या हव्यासापायी हे कृत्य केल्याची कबुली दिली.

पती रंगराजन यांचा तीन कोटी रुपयांचा अपघात विमा काढला होता. त्यावर एक कोटी रुपयांचं कर्जही मिळवलं होतं. मात्र उधारी मागणाऱ्या व्यक्तींचा तगादा वाढू लागला. आपण विम्याचे नॉमिनी होतो, असा दावा ज्योतीने केला आहे. धक्कादायक म्हणजे कर्ज चुकवण्यासाठी माझी हत्या कर आणि विम्याचे पैसे मिळव, अशी योजना खुद्द रंगराजनने आखल्याचा दावा ज्योतीने केला आहे. त्यानुसार आपण राजाच्या साथीने गाडीवर पेट्रोल टाकून जाळल्याचंही तिने सांगितलं. या घटनेला अपघाताचं रुप देऊन विमा मिळवण्याचा आपला प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली बहीण-भावाला तुरुंगात पाठवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here