चोरट्यांनी चक्क कोरोना प्रतिबंधक लसींवरच मारला डल्ला

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयातून 320 डोसची चोरी

जयपूर (राजस्थान) – कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत असताना आता एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातून चक्क कोरोना प्रतिबंधक लसींची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजमधून भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसींच्या 32 वायलची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. एका वायलमध्ये 10 डोस असतात आणि अशा प्रकारे एकूण 320 डोसेसची चोरी झाली आहे. या प्रकरणी रुग्णालयाकडून शास्त्री नगर पोलीस ठाण्यात वॅक्सिन चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लस 12 एप्रिल रोजी गायब झाल्या होत्या. दोन दिवसांनंतर आज सकाळी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, सीएमएचओ ऑफिसकडून सांगण्यात आले की, भारत बायोटेकने निर्मित कोवॅक्सिनच्या 32 वायल हरवल्या आहेत. या प्रकरणात रुग्णालयाकडून चूक झाली आहे की लस सीएमएचओ कार्यालयातून वाहतूक करताना गहाळ झाली आहे हे अद्याप माहिती नाही.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासरणी करण्यात येणार आहे. जर रुग्णालयातील एखादा कर्मचारी यामध्ये सहभागी असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. लसीकरण केंद्राचे नोडल अधिकारी म्हणाले, लसीकरण केंद्रावर येणाऱ्या सर्व लसींची नोंदणी करण्यात येते आणि त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आहे. त्यामुळे असा संशय आहे की, या लसी स्टोअरमधून गायब झाल्या असाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here