पैशांच्या वादातून कोयत्याने वार केल्यामुळे गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पैशांच्या वादामुळे तरुणाने एकावर कोयत्याने वार केल्यामुळे गंभीर जखमी केलेल्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. एरंडवणा परिसरातील साठे चौकात २३ मार्चला ही घटना घडली होती. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली.

इंद्रनील चंद्रभूषण मिश्रा (वय ४०, रा. खिलारवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण शंकर कडू (वय ३७, रा. सिंहगड रोड) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली. याबाबत मंगला मिश्रा (वय ६७) यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मंगला यांचा मुलगा इंद्रनीलने आरोपी प्रवीणकडून पैसे घेतले होते. मात्र, पैसे परत देण्यास उशीर झाल्यामुळे प्रवीणने २३ मार्चला एरंडवणा परिसरातील साठे चौकात इंद्रनीलला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इंद्रनीलचा उपचारांदरम्यान १४ एप्रिलला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी संबंधिताविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. इंद्रनीलचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here