लखनऊ (उत्तरप्रदेश) – वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शारिरीक संबंधांसाठी विरोध करणाऱ्या मुलीचे नराधम बापाने मुंडन केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेश मध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
उत्तरप्रदेशच्या मेरठ येथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वीस वर्षाच्या मुलीने आपल्या नराधम बापाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. पीडितेच्या बापाला दारुचे व्यसन आहे. नशेत असताना तो तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. अनेकदा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्नही त्याने केला मात्र त्यात तो अपयशी ठरला. गेल्या तीन वर्षापासून नराधम बाप नशेत असेच वागत होता. मात्र बाप असल्याने लाजेने कोणाला ती सांगतही नव्हती. मात्र आता पाणी डोक्यावरुन गेले होते. तिची आई नमाज पढायला बसल्यावर नराधम बाप तिच्या खोलीत गेला आणि तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने आरडाओरड सुरू केल्यावर त्या नराधमाने कैचीने तिची वेणी कापली. त्यानंतर तिचे मुंडन केले.
संतापलेल्या मुलीने आता कशाचीही पर्वा करायची नाही असे ठरवून थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरुन नराधम बापावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास करुन आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे कोतवाली पोलीस स्थानकाचे अरविंद टौरसिया यांनी माहिती दिली.






