वांद्य्रात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार

gang-rape

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सोळा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर चारजणांच्या एका टोळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कारासह अन्य भादवी, पोक्सो आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच एका अल्पवयीन मुलासह चारही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलाला डोंगरी सुधारगृहात पाठवण्यात आले, तर इतर तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

पीडित मुलगी आणि चारही आरोपी वांद्रे येथील एकाच परिसरात राहतात. ती सध्या अठरा वर्षांची असून तिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ती सोळा वर्षांची असताना तिच्यावर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेचा आरोपीने मोबाईलवरून व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ दाखवून तिला आरोपीचे तिन्ही मित्र ब्लॅकमेल करायचे.

गेल्या दोन वर्षांपासून ते चौघेही तिच्यावर जबदस्तीने सामूहिक लैंगिक अत्याचार करायचे. तिने हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ते नराधम तिच्यावर दोन वर्षे अत्याचार करत होते. या अत्याचाराला ती प्रचंड कंटाळली. तिने त्यांना तिचे व्हिडीओ डिलीट करून पुन्हा ब्लॅकमेल करू नका अशी विनंती केली. मात्र त्यांनी तिला धमकावून तिच्यावर अत्याचार सुरुच ठेवला. त्यामुळे तिने त्यांच्या धमकीला भीक न घालण्याचा निर्णय घेतला.

एका आरोपीने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ नंतर तिच्या नातेवाईकांना आला. तो पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी हा व्हिडीओ पीडितेच्या पालकांना दाखवला. या मुलीची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिसांत चारही आरोपींविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

यातील अल्पवयीन आरोपीला डोंगरी बाल न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या तो डोंगरीतील बालसुधारगृहात आहे. इतर तिघांना वांद्रे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here