आग्रा (उत्तरप्रदेश) – येथील बृजमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची आणि करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या इतकी आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच ते सहा तास वाट पहावी लागत आहे. इतकच नाही तर रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहे.
रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासासंदर्भातील एका फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. करोनामुळे रुग्णवाहिकांची कमी असल्याने एका मुलाला मरण पावलेल्या वडिलांची तिरडी गाडीवर बांधून त्यांचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये न्यावा लागला. हे दृष्य पाहून स्मशानभूमीमधील अनेकांना अश्रू अनावर झाले.
हा मुलगा आपल्या वडीलांचं पार्थिव घेऊन स्मशानात पोहचल्यानंतर त्याला तिथे काही तास थांबावे लागले. अंत्यविधीसाठी स्मशानात क्रमांक लावून काही तास थांबल्यानंतर या मुलाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही अवस्था पाहून स्मशानभूमितील लोकांनाही अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
आग्रा येथे करोनाबाधितांची संख्या ६०० हून अधिक झाली आहे. मागील ९ दिवसांमध्ये येथे करोनामुळे ३५ रुग्णांचा जीव गेलाय. मैनापुरी जिल्ह्यात ८, फिरोजबादमध्ये दोन, मथुरात ४, एटामध्ये सात, कासगंजमध्ये दोन आणि आग्र्यात एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झालाय. आग्र्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाहीय. त्यामुळेच फिरोजाबाद, मथुरा येथील रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्था असणाऱ्या रुग्णांना पाठवलं जात आहे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.






