गोरखपूर (उत्तरप्रदेश) – आता ऑक्सिजन अथवा औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच गोरखपूर मतदारसंघातील आरोही रूग्णालयातील कोविड सेंटरमधील 5 रूग्णांनी वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून जीव सोडल्याचे संतापजनक वृत्त आहे. मृतांत 3 कोरोना रूग्ण असून, दोघे ह्द्यविकाराचे रूग्ण आहेत.
गोरखपूर कोविड सेंटरच्या अनागोंदी आणि बेपर्वाईच्या कारवाईमुळे ऑक्सिजनचा तुटवडा होऊन रूग्णांचे जीव गेले, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. रूग्णालय प्रशासनाने मात्र आपल्या वाट्याचा ऑक्सिजन दुसऱ्या रूग्णालयाला दिल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र रूग्णालयाच्या दावा फेटाळत या प्रकाराची न्याय दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अनेकदा मागणी करूनही जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने मंगळवारी सकाळी 9 वाजता ऑक्सिजन संपला आणि 5 रूग्णांना जीव गमवावा लागला,असे रूग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
गोरखपूचे महानगर न्यायदंडाधिकारी विजयेंद्र पांडियन यांनी आरोही रूग्णालयाचा दावा पार फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा सध्या नाहीये. स्वत: उपविभागीय दंडाधिकारी जिल्ह्यातील रूग्णालयांच्या प्रशासनावर आणि ऑक्सिजनपुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत:ची बेपर्वाई लपवण्यासाठी खोटे बोलणाऱ्या आरोही रूग्णालय प्रशासनाच्या कारभाराची महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी,असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत






