पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. आरोग्य सेवकांच्या कामाचे कौतुक होत आहे. पण अशा या नाजूक परिस्थितीत पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे हे सहायक आरोग्य महिला अधिकाऱ्यावरच धावून गेल्याची घटना घडली आहे. धनराज घोगरे यांनी अरेरावी केल्यामुळे महिल्या अधिकाऱ्याला रडू कोसळले आहे. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीबाबत विचारणा केली होती. याबद्दल ते पाठपुरावा करण्यासाठी वैशाली जाधव यांच्याकडे गेले होते. त्यावेळी
धनराज घोगरे आणि डॉ. वैशाली जाधव यांच्यात नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीवरून आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनातच प्रचंड वाद झाला. यावेळी नगरसेवक घोगरे यांनी महिला डॉ. वैशाली जाधव यांच्यावर अरेरावी केली.
डॉ. वैशाली जाधव या लसीकरण विभागाच्या प्रमुख आहेत. दहा दिवसांपूर्वीच लसीकरणाचा चार्ज डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे सोपवला गेला आहे. प्रत्येक नगरसेवकाला स्वत:च्या वार्डात लसीकरण केंद्र हवे आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. परंतु, नगरसेवकाच्या अशा दमदाटीमुळे अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगरसेवक घोगरे यांच्या दमदाटीमुळे डॉक्टरांनी काम बंदचा पवित्रा घेतला होता.






