अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यावर हत्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातल्या काही तरुणांनी विजयची हत्या केल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास विजयच्या घरी 5 ते 7 तरुण आले आणि त्यांनी विजयला बिल्डींगच्या आवारात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली, त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली. हा प्रकार इथेच थांबला नाही. विजय अर्धमेला झाल्यानंतर या टोळक्याने त्याला रस्त्यावर फरफटत नेते रस्त्याच्या पलीकडे नेऊन फेकून दिले. त्यानंतरही त्याला मारहाण केली. विजयने जीव सोडला याची खात्री झाल्यानंतर या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला. धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार सुरू असताना रस्त्यावर वाहतूक सुरूच होती. एका कारमधून जाणाऱ्या तरुणाने हा हत्येचा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.

मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात चारचाकी वाहनातून जाणाऱ्या तरुणाने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. शिवाय काही मिनिटात हत्येचा हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

या घटनेनंतर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान, या हत्येनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या या हत्या झालेल्या तरुणाचा मृतदेह उल्हासनगर च्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here