पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कलम ४५७, ३८० मधील दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीस पोलीस पकडण्यासाठी गेले असता त्याने स्वतःच्या हातावर चाकूने कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार दि. १४ मे रोजी पहाटे ५.०० वा.च्या सुमारास उरुळीदेवाची, पालखी रोड या ठिकाणी घडला आहे. आरोपीवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.बल्लुसिंग टाक (वय-३० वर्षे, रा. धनगरवस्ती, उरुळीदेवाची) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लुसिंग टाक हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. उरुळीदेवाची येथील धनगरवस्ती या ठिकाणी त्याच्या राहत्या घराजवळ त्याला पकडण्यासाठी गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी बल्लुसिंग त्याच्या मोटारसायकलवरून पळून जाऊ लागला. उरुळीदेवाची येथील पालखी रोडवर आला असता त्याची मोटारसायकल स्लिप झाली. तिला तेथेच सोडून देऊन तो माळरानावर पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने त्याने स्वतःच्या दोन्ही हातावर चाकूने कापून घेतले. तसेच त्याने खिश्यातील ब्लेडने स्वतःच्या हातावर, छातीवर व पोटावर कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अमित साळुंखे यांच्या फिर्यादीवरून बल्लुसिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शिंदे करीत आहेत.






