नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा किंवा मुदड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात असा प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाजवळील साहित्य चोरणाऱ्या टोळीलाच अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून अजूनही या प्रकरणी चौकशी केली जात आहे.
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णावर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी थेट रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. रुग्णालय आणि स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यविधी करतात. अनेकदा काही कंपन्यांना कंत्राट देऊन हे काम केलं जातं. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही एका खासगी कंपनीला कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचं काम देण्यात आलं होतं. पण हे काम करणारे कर्मचारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या साहित्याची चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.
कोरोना रुग्णांच्या मृतदेहाजवळचे साहित्य चोरणाऱ्या या टोळीला नागपूरच्या तहसील पोलिसांनी गजाआड केलं आहे. गणेश डेकाटे आणि छत्रपाल सोनकुसरे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून मृतांचे मोबाईल, घड्याळी, पैसे असा 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळी मध्ये आणखी काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.
कोरोनाच्या या संकटकाळामध्ये माणुसकी संपली असल्याची अनेक उदाहरणं समोर आली. पण नागपुरात पाहायला मिळालेला हा प्रकार म्हणजे या सर्वावर कळस असं म्हणावं लागेल. कुटुंबातील व्यक्ती आपल्यातून गेली म्हटल्यावर अनेकदा कुटुंबीयांना त्यांच्या वस्तू किंवा मृतांकडे असलेल्या ऐवजाचा विचारच नसतो. अशा वेळी प्रामाणिकपणे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या या वस्तू आठवण म्हणून तरी द्यायला हव्या. मात्र मुदड्याच्या टाळूवरचं लोणी खायची तयारी असणाऱ्या अशा अमानवी वृत्तीच्या लोकांना ते कसं समजणार.






