अहमदनगरमध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूच्या दाखल्यांसाठी 600 रुपयांची लूट

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनामुळे मृत झालेल्यांचे व त्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याचे दुःख सहन करणारांची आर्थिक लुटमार थांबायचे नाव घेत नाही. मृत झालेल्यांच्या नावावरील बँक खाती, कर्ज पॉलिसी, विमा भरपाई, गॅसनोंदणी वा अन्य कामांसाठी आवश्यक असलेला मृत्यू दाखला मिळण्यासाठी नगरमध्ये चक्क 600 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ही लुटमार कोण रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना रुग्णांसाठी औषध व रेमडेसिविर इंजेक्शनसह ऑक्सिजनसाठी त्यांचे नातेवाईक भगीरथ प्रयत्न करतात; परंतु या प्रयत्नांना पैशांची फोडणी द्यावी लागते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक कफल्लक होण्याच्या वाटेवर आहेत. औषधे, हॉस्पिटलचे बिल, रेमडेसिविर यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली जाते. त्यातच मनपा प्रशासनातील काहीजणांकडून मृत रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेतून मिळणारा मृत्यूचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो; परंतु हा मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. हॉस्पिटल अथवा घरी मृत झालेल्यांची नोंदणी महापालिका कार्यालयात होते. तत्काळ दाखला हवा असल्यास 50 रुपये, तर इतरवेळी 20 रुपये शुल्क घेऊन नागरिकांना मृत्यू दाखला देण्यात येतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांतून कर्मचाऱयांची 15 टक्के उपस्थिती ठेवून कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश आहेत; परंतु महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळील सेतू कार्यालय 8 एप्रिलपासून बंद आहे. त्यामुळे या कार्यालयातून मिळणारे सर्व प्रकारचे दाखले देणेही बंद आहे. कोरोनाने मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना आधीच मोठी आर्थिक झळ बसलेली असताना आता मृत्यूचे दाखले मिळण्यासाठीही मोठी रक्कम देण्याची वेळ आली आहे. सेतू कार्यालय बंद असल्याचा गैरफायदा घेऊन काही संधीसाधूंनी मनपा कार्यालयासमोरच हा गोरखधंदा सुरू केला आहे. यामध्ये दाखला देण्यासाठी 600 रुपये घेतले जातात.

8 एप्रिलपासून मनपाचे सेतू कार्यालय व जन्म-मृत्यू विभाग नोंद बंद आहेत. त्यामुळे मृत्यू दाखल्यांचे वितरण अधिकृतपणे बंद आहे. मात्र, अनधिकृतपणे गरजवंतांना लुबाडून असे दाखले दिले जात आहेत. मनपाच्या सेतू कार्यालयामागील बोळात व नगर-कल्याण रस्त्यावर हा प्रकार सुरू आहे. मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते.

मृत्यूचे दाखले देण्यासाठी आज महापालिकेमध्ये गर्दी झाली ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हायला पाहिजे, अशा आपण सूचना दिलेल्या आहेत. दाखल्यांची जी किंमत आहे, तीच घेतली पाहिजे. कुणी अवाजवी पैसे घेत असल्याची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. यासह अवाजवी पैसे घेणाऱयांची चौकशीही केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here