सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – कोरोना महामारीने सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात गोरगरीब निराधार आणि अपंग नागरिकांना पाच रुपयांत पोट भरून जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. येथील दयावान तालीम मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे अनेकांना जेवण मिळत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रामदास मधाळे यांच्या संकल्पनेतून ५ रुपयात थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोज सकाळी व संध्याकाळी अडीचशे ते तीनशे नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. हा उपक्रम निराधारांसाठी मोठे आधार केंद्र बनले आहे.
कुरुंदवाड येथे कर्नाटक राज्यातील वीट भट्टी कामगार, शेतमजूर, निराधार, अपंग नागरिकांची व रोजंदारसाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना रोजगार नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामाजिक संस्थांनी कोव्हीड सेंटरला देणगी देऊन आपली भूमिका बजावत अन्नदानाच्या उपक्रमालाही मदत केल्याचे दिसत आहे. ही गरज ओळखून शहरात सामाजिक कार्यकर्ते मधाळे व नगरसेवक अनुप मधाळे यांनी येथील दयावान तालीम मंडळाच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर येथे पाच रुपये नाममात्र किमतीत पोटभर जेवण देण्याचा आदर्श उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाने गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहे. दोन चपाती, भात, भाजी, आमटी, लोणचे, पापड असे थाळीचे स्वरूप आहे. संचारबंदीच्या काळात तालुक्यात निराधार लोकांना अन्न पुरवठा करण्यासाठी अन्नपूर्णा व्हॅन सुरू करण्याचा मानस असल्याचे नगरसेवक मधाळे यांनी सांगितले.






