कोलकाता – राज भवनावर शेळ्या नेत आंदोलन करण्याची राज्यपाल जगदीप धनखर यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी शहर पोलिस प्रमुखांकडे याचे स्पष्टीकरण मागितले. राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्विटही केले. त्यांनी ‘राज्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावली आहे. राजभवनाच्या मुख्य दरवाजावळही त्याचा प्रत्यय येतो. नुसते बघ्याची भुमिका घेतलेले पोलिस परवानगी नसलेल्या ठिकाणाही कोणालाही ये जा करण्याची मुभा देत आहेत.’ असे ट्विट करत ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलिसांनाही टॅग केले.
सीबीआयने टीएमसीचे मंत्री फिरहाद हाकीम, सुब्राता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना नारदा टेप प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर टीएमसीने सोमावारी राज्यभर आंदोलने केली. मंगळवारी एका सामजिक संस्थेने कोलकात्यातील राज भवनावर शेळी मोर्चा नेला. हा अजब आणि गजब मोर्चा जे उच्च पदावर बसले आहेत त्यांना पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती चिघळत आहे याची जराही काळजी नाही म्हणून काढण्यात आला होता.
याबाबत धनखर यांनी ‘राज भवन परिसराची सुरक्षा भेदण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. उत्तर दरवाजासमोर काही निमय मोडणाऱ्यांनी आंदोलन केले त्यावेळी पोलिस बघ्याची भुमिका घेत होते. मोठ्या पोलिस बंदोबस्तासमोर या कथित आंदोलनकर्त्यांचे आंदोलन दोन तास सुरु होते.’ असे वक्तव्य केले. दरम्यान, शेळी आंदोलन करणाऱ्या कोलकाता नागरिक मंचच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ते पोलिसांसमोर शेळ्या घेऊन ५ ते ७ मिनिटेच उभे होते. पहिल्यांदा पोलिस भांबावले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलक आणि शेळ्यांना कडक सुरक्षा असलेल्या भागातून बाजूला नेले.






