धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरातील मोंढा भागात पहाटे गोळ्या झाडून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील मार्केट यार्डमध्ये रोहन जाधव यांची आडत आहे. तेथे पाच ते सहा हमाल काम करतात. त्यापैकी मचिंद्र माने (40) हा इसम हमालीसोबत जाधव यांच्या अडतीवर वॉचमन म्हणून देखील काम करत होता. शुक्रवारी रात्री जाधव यांच्या अडतीच्या बाहेरच्या परिसरात माने झोपला असताना अचानक मध्यरात्री भिंतीवरून उडी मारून अज्ञात इसमाने मानेला मारहाण करायला सुरुवात केली.
दोघांमध्ये झटापटी झाली आणि आणि नंतर माने खाली पडले. सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. झटापटीत स्पार्क झाल्याचं दिसतं आहे, त्यानंतर माने खाली पडले. त्यामुळे माने यांच्यावर गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माने यांच्या पोटावर आणि छातीवर जखमेचे व्रण दिसत आहेत.
ही घटना घडल्याचं कळताच जाधव यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. वॉचमनचा खून झाल्याने अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदीप पालवे यांनी घटनास्थळी पोहोचून परिसरात लोकांकडून आणि आडत मालकांकडून माहिती घेतली आहे. लागलीच श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. मचिंद्र माने यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांचा खून झाला की मारेकरी दरोडय़ाच्या हेतूने आले होते की अन्य कारणामुळे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.






