वांग्याची भाजी दिली नाही म्हणून पतीने पत्नीला जाळले

उदगीर – वांग्याची भाजी जेवणासाठी दिली नाही म्हणून बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळल्याची घटना उदगीर तालुक्यातील मौजे हेर येथे घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिला फरजाना शादूल शेख (रा.हेर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचा नवरा शादूल शेख याचे इतर दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत तसेच तो सतत दारु पित असतो. लग्न झाल्यापासून तो फिर्यादीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. 8 जून रोजी फिर्यादीने सकाळी 8 वाजता स्वयंपाक केला.

मात्र, तिचा नवरा न जेवता घरातून बाहेर गेला आणि रात्री 9.30 वाजता दारु पिऊन घरी आला. सकाळी केलेली वांग्याची भाजीच जेवायला दे असे त्याने सांगितले. सकाळी केलेली भाजी संपलेली असं बायकोने त्याला सांगितल्यावर मला तीच भाजी हवी म्हणून त्याने शिवीगाळ केली.

चुलीजवळ ठेवलेल्या रॉकेलच्या बाटलीमधील रॉकेल फिर्यादीच्या अंगावर टाकून काडी पेटवून फिर्यादीच्या अंगावर टाकली. शेजारी राहणाऱ्यांनी आग विझवून फिर्यादीस उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी शादूल नजीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here