रामजन्मभूमी जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; 2 कोटींची जमीन 8 मिनिटांत 18 कोटींना खरेदी केली

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे भव्य राममंदिर उभे रहावे यासाठी देशभरातील कोटय़वधी जनतेने खारीचा वाटा उचलत देणगी दिली. राममंदिराचे कामही सुरू झाले आहे. मात्र, आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. 2 कोटी रुपयांची जमीन ट्रस्टने तब्बल 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. हा व्यवहार अवघ्या 8 मिनिटांत झाला अशी माहिती पुढे आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केले आहे. आता या ट्रस्टवर जमीन खरेदी व्यवहारावरून आरोप होत आहेत. आज आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये किमतीची जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केली. हे तर ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपाचे अयोध्येतील माजी आमदार संजय पांडे यांनी या जमीन खरेदीतील दस्ताऐवजच मिडियासमोर ठेवले. राम जन्मभुमीच्या जमीनीला लागून असलेली जमीन हरीष पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च 2021 ला सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांना 2 कोटी रूपयांना विकली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हीच 12080 चौरस मीटर जमीन तब्बल 18.5 कोटी रूपयांना राम जन्मभुमी ट्रस्टने खरेदी केली? ही तर राममंदिराच्या नावावर भक्तांची फसवणूक असल्याचा आरोप पांडे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here