दोंडाईचा (प्रतिनिधी) – शहरात गेल्या एक महिन्यापासून नगरपालिकेच्या सर्व नळांना गाळयुक्त, जंतुसहित दूषित पाणी पुरवठा होत आहे. याची तात्काळ चौकशी करुन दोंडाईचा शहरवासियांना शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी दोंडाईचा शहर शिवसेना-युवासेना, महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा न केल्यास पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, दोंडाईचा शहरात गेल्या एक महिन्यापासून नगरपालिकेच्या सर्व नळांना गाळयुक्त व जंतुसहित दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले असून जनतेच्या आरोग्याच्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुध्द पाणी मिळत नसल्याने लोकांना घश्याचा त्रास होणे सुरु झाले आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. दुषित पाण्यामुळे कोरोना व साथीचे रोग वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत होत असलेल्या दुषित पाणी पुरवठ्याची चौकशी करुन तात्काळ शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, असेही नमुद केले आहे.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका विजयाताई ठाकूर, तालुकाप्रमुख विजयाताई मराठे, शहरप्रमुख सुनंदा पवार, लक्ष्मी ठाकूर, प्रिती वाल्हे, माधुरीताई चिंचोलीकर, कविता जाधव, कमलाताई यांसह युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, शिवसेनेचे उपशहरप्रमुख विजय वाडीले, चुडामण बोरसे, राज ढोले, चेतन साबळे, आबा चित्ते, निलेश विसावे आदी उपस्थित होते.



