वर्धा (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात १८ ते ४६ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजन केले होते. पण, केंद्र सरकारने ती जबाबदारी घेतली. काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागत लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण, केंद्राकडून लशीचा पाहिजे तसा पुरवठा होत नसल्याने तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. यवतमाळला केंद्र सरकारने दिलेल्या ३५ पैकी १४ व्हेंटिलेटर बंद पडले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागली आहे मात्र कोकणातील राजकारणात त्याचा काही फरक पडेल, असे वाटत नाही. शिवसेना कोकणात मजबूत आहे, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांन केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. भाजपकडून पंकजा मुंडे आणि जुन्या नेत्यांना डावलले जात आहे, हे अधोरेखित झाले आहे, असेही सामंत म्हणाले.



