अहमदनगर (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे कुकाणा पोलिसांनी छापा टाकत २ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा २६ किलो गांजा पकडला आहे. पोलिसांना खबऱ्याकडून चिलेखनवाडी येथील जुन्या इरिगेशन कॉलनीमधील एका बंद खोलीत गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांना छापा टाकला. त्यावेळी चार संशयितांना पकडून चौकशी केली असता एका बंद खोलीत २६ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण पळून गेला आहे. शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथून हा गांजा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. २ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा गांजा व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक विजय करे व दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला.






