कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारताच्या डावाची सुरुवात सलामीवीर पृथ्वी शॉ याने थाटात केली. त्याने २४ चेंडूतच ४३ धावा चोपल्या. त्याने करुन दिलेल्या तुफानी सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेचा ७ गड्यांनी पराभव केला. इशान किशनने ४२ चेंडूत ५९ धावा फटकावल्या. लंकेच्या ५० षटकांत ९ बाद २६२ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३६.४ षटकांत ३ बाद २६३ धावा केल्या.
कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केलेल्या शिखर धवनने अखेरपर्यंत नाबाद राहताना ९५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ८६ धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मात्र, जोरदार सुरुवात करुन दिलेल्या पृथ्वीच्या जोरावर भारताचा विजय सुकर झाला. पृथ्वीलाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
डावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दुश्मंथा चमिरा याला सलग दोन चौकार लगावले. त्याने २४ चेंडूत ४३ धावा करताना ९ चौकार लगावले. एका बाजूने शिखर धवन संयमी खेळी करत असतानाच पृथ्वीने आपले जोरदार आक्रमण केले. ५८ धावांच्या भागीदारीत ४३ धावा एकट्या पृथ्वीने केल्या. त्याने चौथ्या षटकांतही इसरु उदानाला सलग तीन चौकार लगावले. अखेर धनंजय डिसिल्वाने त्याला बाद केले. मात्र इशान किशननेही लंकेची चांगलीच परीक्षा घेतली. पृथ्वी बाद झाल्यावर इशानने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. इशानने आपल्या अर्धशतकी खेळीत दोन षटकार व ८ चौकार मारले. त्याने कर्णधार धवनसह ८५ धावांची भागीदारी केली. किशनही बाद झाल्यानंतर धवनने अखेरपर्यंत टिकून राहताना जबाबदारीने खेळत भारताचा विजय साकारला.
त्या आधी दीपक चहर सोबतच कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्या शानदार गोलंदाजीने भारताने श्रीलंकेला ९ बाद २६२ धावांवर रोखले. चहरने ३७ धावांवर दोन बळी घेतले, तर कुलदीपने ४८ धावा देत आणि चहलने ५२ धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. कृणाल पांड्याने फक्त २६ धावा देऊन एक बळी घेतला. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने नियमित अंतरात बळी गमावले. यजमानांकडून कोणालाही अर्धशतक करता आले नाही.
चमिका करुणारत्ने याने नाबाद ४३ धावा केल्या. तर कर्णधार दासुन शनाका (३९) चरथ असालांका (३८)आणि अविष्का फर्नांडो (३२) यांनी देखील उपयोगी खेळी केली. लंकेचा कर्णधार दासुन शानका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी ९.१ षटकांत ४९ धावांची भागिदारी केली. चहर आणि भुवनेश्वर दोघांना बॉल स्विंग करण्यात यश आले. मात्र गडी बाद करता आला नाही. धवन याने दहाव्या षटकात फिरकी गोलंदाजाला संधी दिली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २६३ धावा (चमिका करुणारत्ने ४३, दासुन शनाका ३९; दीपक चहर २/३७, कुलदीप यादव २/४८, युझवेंद्र चहल २/५२) पराभूत वि. भारत : ३६.४ षटकांत ३ बाद २६३ धावा (शिखर धवन ८६, ईशान किशन ५९; धनंजय २/४०.)






