सुलतानपूर (उत्तर प्रदेश ब्यूरो चीफ सय्यद एजाज अहमद) : उत्तर प्रदेशातले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष जंग बहादूरसिंह यांना गुरुवारी विशेष एमपी-एमएलए फास्ट ट्रॅक कोर्टाने जन्मठेप आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ३० जून १९९५ मध्ये सूर्यप्रकाश यादव या तरुणाची हत्या झाली होती. त्या हत्येमध्ये दोषी आढळल्याबद्दल तब्बल २६ वर्षांनी जंग बहादूरसिंह यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील अतुल शुक्ला यांनी दिली आहे.
एपी-एमएलए कोर्टातील न्यायाधीश पी. के. जयंत यांनी जंग बहादूरसिंह यांना शिक्षा ठोठावली. निवडणुकीतील वैरातून ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर मृत सूर्यप्रकाश यादव याच्या भावाने जंग बहादूरसिंह, त्यांचा मुलगा दद्दन सिंह, पुतण्या रमेश सिंह, समर बहादूर सिंह आणि हर्ष बहादूर सिंह यांनी आपल्या भावाची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली होती. यापैकी एक आरोपी दद्दन सिंह याची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती, अशी माहितीही सरकारी वकील शुक्ला यांनी दिली.
निवडणुकीदरम्यान राजकीय वैमनस्यातून अनेक हत्या केल्या जातात. साधारणपणे निवडणूक काळात विरोध करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याची हत्या होते आणि नंतर हत्या करणाऱ्यावर कारवाई होत नाही. उत्तर प्रदेशात १९९५ मध्ये ही राजकीय हत्या झाली होती तिचा निकाल आज २६ वर्षांनी लागला आहे. त्यातही न्यायालयाने बड्या राजकीय नेत्याला जन्मठेपेसारखी शिक्षा दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे सामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल. देशातील न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देते आणि देईल असा जनसामान्यांचा विश्वास अधिक बळकट होईल.






