सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सांगली तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी ‘आबासाहेब अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या.
२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. एक पक्ष, एक मतदारसंघ आणि एकच नेता असा विश्वविक्रमी सांगोल्याचा वारसा आज हरपला आहे. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केलं आहे.
खरंतर, गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती.
दरम्यान, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यभरातून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी गणपतराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.






