उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे लखनऊ येथील रुग्णालयात आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनकच होती. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेता गमावला आहे.

दरम्यान, अयोध्येतील भव्य राम मंदिराचं दर्शन घेऊनच या जगाचा निरोप घेण्याची कल्याण सिंह यांची अंतिम इच्छा होती. ही त्यांची इच्छा अधुरी राहिली. उत्तर प्रदेशातील भाजपचा दिग्गज नेता अशी कल्याण सिंह यांची ओळख होती. कल्याण सिंह यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. १९९१ मध्ये प्रथम आणि नंतर १९९७ मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उत्तर प्रदेशमधून संसदेतही भाजपकडून सिंह यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे.

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत कल्याण सिंह यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल नेता, कर्तव्यकठोर प्रशासक आणि तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेला नेता आम्ही गमावला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here