पुण्यात अनैतिक संबंधातून तरुणीचा खून करून मृतदेहाचे तुकडे लवासा घाटात फेकले; तरुणीचा खून करणारा अटकेत

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : अनैतिक संबंध असलेल्या तरुणीचा खून करून तिच्या शरिराचे तुकडे करत ते लवासा घाटात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेतील एक महिला बेपत्ता असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलिसांना कौशल्याने तपास करून आरोपीला अटक केल्यानंतर या खूनाचा उलगडा झाला.

हनुमंत अशोक शिंदे (वय ४०, रा. नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत कविता चौधरी उर्फ रोझियाना रियाज पानसरे (वय ३०, रा. बुधवार पेठ) हिचा खून झाला आहे. शिंदे याने खून करून कविता हिच्या शरिराचे तुकडे केले व ते लवासा घाटात फेकले. तपासात पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे आढळले असून ते जप्त करण्यात आले आहेत. हे अवशेष पुढील तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेत वास्तव्याला असलेली ही तरुणी दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली होती. तिच्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल होती. खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाला या तरुणीचे हनुमंत शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यामुळे पथकाने शिंदे याच्या हलचालींवर लक्ष ठेवले. त्याला संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने खून केल्याचे निष्पन्न झाले.

खून केल्यानंतर शिंदे हा फ्लॅट बंद करून अक्कलकोट येथे निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फ्लॅटवर परत आला. १४ तारखेच्या रात्री त्याने कविता हिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे ताडपत्रीच्या पिशवीत भरले. मित्राला घराचे साहित्य शिफ्ट करायचे असल्याचे सांगून टेम्पो आणला. टेम्पोत त्याने ते तुकडे टाकले. भुगाव ते लवासा घाट परिसरात ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. पोलिसांनी पंचनामा करून ते तुकडे जप्त केले आहेत, अशी माहिती उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here