‘महाराष्ट्र केसरी’ आप्पालाल शेख यांचे निधन

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आणि महाराष्ट्र केसरी मल्ल आप्पालाल शेख यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. आप्पालाल शेख यांच्या अकाली निधनाने कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सायंकाळी बोरामणी गावात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.

दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील पैलवान आप्पालाल शेख यांनी १९९१ साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरियासह इतर देशांच्या प्रतिस्पर्ध्यांना लोळवून अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या मल्ल्याला आस्मान दाखवून भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले होते.

त्यानंतर १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात आप्पालाल शेख यांनी किताबी लढतीत संजय पाटील यांना लोळवून मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावली. प्रतिस्पर्धी मल्लाला ‘घिस्सा’ डाव टाकून कुस्तीत नामोहरम करणे ही आप्पालाल शेख यांची विशेष हातोटी होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here