अण्णाभाऊंच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ७१ गुंठे संपूर्ण जागेसाठी आग्रही मागणी; नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांची सर्वसाधारण सभेत भूमिका

स्मारकाचा

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंढरपूर येथील स्मारकाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना आता पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेदांत भक्त निवास शेजारील गाडगे महाराज चौक परिसरातील सर्वे नंबर ५९/३ मधील संपूर्ण ७१ गुंठे जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हे, तर आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून कष्टकरी, वंचित आणि सामान्य माणसाच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर होते. त्यांच्या कार्याचा आणि साहित्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंढरपुरात केवळ पुतळा उभारून थांबण्याऐवजी भव्य, सर्व सुविधांनीयुक्त स्मारक उभारावे, अशी समाजबांधवांची भूमिका आहे.
प्रस्तावित जागा अपुरी असल्याने भविष्यात स्मारकाचा विस्तार तसेच आवश्यक सुविधा उभारण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वे नंबर ५९/३ मधील संपूर्ण जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्याकडून करण्यात आली आहे.
या स्मारकात सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका केंद्र, साहित्य दालन तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे स्मारक केवळ वास्तू न राहता साहित्य, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र ठरू शकते.
पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेदरम्यान नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे स्मारकाच्या रखडलेल्या प्रश्नाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण ७१ गुंठे जागा उपलब्ध झाल्यास अण्णाभाऊंच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी लढा देणाऱ्या समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here