कल्याणमध्ये किरकोळ वादातून २ तरुणांवर प्राणघातक हल्ला

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण पूर्वेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता पुन्हा एकदा कल्याण पूर्व एका गंभीर घटनेनं हादरले आहे. धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पुर्वेतील काका ढाबा परिसरात घडली आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे.

विजय दुबे आणि संतोष प्रजापती हे दोघे व्यावसायिक दुकान बंद करुन पान खाण्यासाठी टपरीवर गेले होते. या ठिकाणी धक्का लागला म्हणून काही तरुणांनी धारदार शस्त्र आणि काठी घेऊन या दोघांवर हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून कल्याणमध्ये भर रस्त्यात गावगुंडाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी चिकणी पाडा परिसरात काही गुंडांनी रिक्षाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता . महिनाभरापूर्वी चक्की नाका परिसरात देखील अशाच प्रकारे काही तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली होती..कल्याण पूर्वेत सुरक्षारक्षकावर देखील प्राणघातक हल्ला झाला होता.तर एका बिल्डरने रहिवाशाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. इतकंच नाही तर तरुण -तरुणींना भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याच्या घटनेने तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here