पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दुचाकीस्वार तरूणांचा पाठलाग करून त्यांना चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या फुलगाव हवेली परिसरात घडली. कपील यादव शिनगारे (वय२३), दीपक रावसाहेब विटेकर (वय २१), संतोष राजेंद्र भोरे (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सोमनाथ तांबे (वय ४०, रा. भावडी ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि त्यांचा मित्र युसूफ दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी फुलगाव परिसरात दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने सोमनाथला चाकूचा धाक दाखविला. तर दुसऱ्याने युसूफला उलट्या कोयत्याने मारहाण केली. त्याशिवाय त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल असा २० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.






