अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा मुद्दा राज्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजधानी मुंबईमध्ये घडलेल्या साकीनाका प्रकरणानं राज्य सरकारला टीकेला सामोरं जाव लागतंय. त्यातच आता अमरावतीत घडलेल्या दोन घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे.
अमरावती तालुक्यातील वनोजा गावात राहत असलेल्या एका ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ११ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे मुलीचे आई-वडील पोटापाण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करण्यासाठी गेले. आपल्या पोटच्या मुलीला आजी आजोबांकडे सोडलं. पण पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली असताना मुलीला शेतात जाऊ म्हणत तरूणाने पिडीतेला दुचाकीवरून लांब शेतात नेलं.
शेतात कोण नसल्याचं बघून त्याने लहान मुलीवर अत्याचार केले. आई वडील घरी आल्यानंतर मुलगी रडताना दिसली. त्यावेळी मुलीला विचारणा केल्यानंतर मुलीने झालेली घटना आई वडिलांना सांगितली. त्यानंतर आई वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीसांना झालेला घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हे दाखल केले आणि गुन्हेगारांना अटक केली आहे.






