एक गिर जातीचा बैल व चार गाई चोरट्यांनी पळवल्या; पोलिसांनी तक्रार न घेता शेतकऱ्यालाच सुनावले

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : येथील एका प्रगतशील शेतकऱ्याचा एक गिर जातीचा बैल आणि चार गाई अशी पाच जनावरे रात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पळवून नेले. या चोरीमुळे शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.असे प्रकार नेहमीच घडत आहेत.पोलिसांकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

रात्रीच्यावेळी गुरे चोरण्याचे प्रकार खालापूर,कर्जत,पाली व लोणावळा या परिसरात सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खोपोली शहरात डोंगरावर घाटरस्त्याच्या बाजूला अनेक वेळा गुरांची कत्तल झाल्याचे समोर आले आहे, तर खोपोली नजीक पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरात भुलीचे इंजेक्शन देऊन गुरे चोरणाऱ्या टोळीचा करारनामा एका सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला जगाने पाहिला पण याबाबत ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही. रात्री अपरात्री फिरणाऱ्या सामान्य नागरिकांना रात्रीच्यावेळी गस्तीवर असणारे पोलीस थांबवून विचारपूस करतात गाड्यांची तपासणी करतात मग या गुरेचोरांच्या गाड्या कश्या सुटतात हा प्रश्न सर्वाना पडतो.असाच एक प्रकार कर्जत तालुक्यात घडला.गुरे चोरी नंतर तक्रार करायला गेलेल्या शेतकऱ्याला उलटे सुनावून परत पिटाळण्यात आले हे ही एक आश्चर्य असून आता या गुरेचोरांवर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘माझी पाच गुरे चोरीस गेली त्यात माझे नुकसान झाले मात्र असे प्रकार वारंवार घडतात. याबाबत पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर आम्हालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. खरे तर पोलीस यंत्रणा सक्षम आहे कारण सी सी टीव्ही फुटेज द्वारे ते मोठं मोठे गुन्हेगार पकडू शकतात. आम्ही कुठून फुटेज देणार. शेतकऱ्यांना कुठेच न्याय मिळत नाही हे मात्र खरे.’
– हरिश्चंद्र ठोंबरे, प्रगतशील शेतकरी, कोषाणे

मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कोषाणे गावचे प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांची बारा गुरे नेहमी प्रमाणे चरण्यासाठी गुरचारणीमध्ये गेले होते. त्यातील सहा गुरे पहाटेच्या सुमारास घरी आली. पहाटेच्या सुमारास ठोंबरे दूध काढण्यासाठी गोठयात आले असता त्यांना उर्वरित सहा गुरे दिसली नाहीत. ते ती गुरे शोधण्यासाठी कर्जत – कल्याण रस्त्यावर आले असता त्यांना एक गाय रस्त्यावर बसलेली दिसली. त्यांनी तिला कसेतरी उठवले व गोठ्यात आणले. ती अगदी गर्भगळीत झाली होती. सकाळी डॉक्टरांना बोलवून गाईची तपासणी केली तेंव्हा तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तपासणी केलेल्या डॉ. के. के. सलगर यांनी सांगितले. तसा दाखला सुद्धा त्यांनी दिला.हा दाखला घेऊन थोरवे यांचा मुलगा पोलीस पाटीलां बरोबर तक्रार नोंदविण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात गेले असता तेथे असलेल्या ठाणे अंमलदाराने तक्रार न घेता उलट त्यालाच चार शब्द सुनावले. दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्र ठोंबरे यांनी वरई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष फराट यांच्या सह त्या दिवशीच्या ठाणे अंमलदारांची भेट घेऊन तक्रार घेण्याची विंनती केली. त्यावर त्यांनी तुम्ही त्या परिसरातील सी सी टीव्ही फुटेज आम्हाला दया असे सांगितले. यावर वैतागून ठोंबरे यांनी पोलीस ठाण्याच्या नाद सोडला. त्यांच्यावर गप्प बसण्यावाचून गत्यंतर नव्हते. मात्र पोलीस ठाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here