बीड (प्रतिनिधी) : कडा शहरातील सुंदर नगर येथे राहणाऱ्या एका वेटर तरूणाचा मृतदेह एका महिलेच्या घरात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत मंगळवारी सकाळी आढळून आला. मन्सुर चाॅद शेख असे मृत तरूणाचे नाव असून, त्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे यामुळे तरूणाची हत्या की आत्महत्या अशी चर्चा शहराभर सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदर नगर येथे राहणारा मन्सुर चाॅद शेख (२२) एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत असे. आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती लगत एका भाडेकरू महिलेच्या घरात त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेने लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस शिपाई बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. घरात मृतदेह आढळून आल्याची वार्ता शहरात पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. ही हत्या की आत्महत्या याबद्दल उत्तरीय तपासणीनंतरच खुलासा होणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.






