कोलकाता येथील फायनान्स कंपनीवर सिनेस्टाईल दरोडा

kolkata-daroda

कोलकाता (पश्चिम बंगाल) : येथील मुथ्थुट फायनान्स कंपनीत घुसलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुल दाखवत सोनं आणि पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांची चांगलीच पंचाईत झाली. दिवसाढवळ्या दरोडा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंदननगरमध्ये मुथ्थुट फायनान्स कंपनीचं कार्यालय आहे. या कार्यालयातील सोनं आणि कॅश लुटण्याच्या तयारीत चार दरोडेखोर सामान्य ग्राहक बनून आले. कार्यालयात पोहोचताच त्यांनी खिशातून पिस्तुल काढलं आणि सर्वांना शांत राहण्याची धमकी दिली.

मात्र तेवढ्यात एका कर्मचाऱ्याने तिथला सायरन वाजवला. सायरनचा आवाज ऐकून दरोडेखोरांचा पारा चढला आणि त्यांनी सायरन वाजवणाऱ्या कर्मचाऱ्याला पिस्तुलीच्या दंडुक्यानं मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या डोक्यात गंभीर वार झाले आणि तो रक्तबंबाळ झाला. पोलिसांची एन्ट्री सायरन वाजल्यानंतर पोलिसांची कुमक कार्यालयाबाहेर जमा झाली तर कार्यालयातील सुरक्षा रक्षकानेही दरोडेखोरांशी संघर्ष करायला सुरुवात केली. पोलीस आल्याचं समजल्यावर दरोडेखोर कार्यालयातून बाहेर आले आणि दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाच्या गॅलरीतून त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या झटापटीत पोलिसांनी दोन दरोडेखोरांना पकडलं तर इतर दोघे गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले.

जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार या घटनेत कंपनीचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दरोडेखोरांना पकडण्यासाठी शहरात चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली असून लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. राज्यस्तरीय मोठ्या दरोडेखोर गँगचे ते सदस्य असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पल्सर मोटरसायकल आणि कार जप्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here