लातूर (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एक लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि दोघांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लातूर येथे राहणारे दोन इसम विनापासपरवाना गावठी पिस्तूल बाळगुन आहेत व ते थोड्याच वेळात जुना रेणापूर नाक्या कडून एमआयडीसी रोडने कारमधून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभेदार रामजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या टि-पॉईण्टजवळ सापळा लावला. थोड्याच वेळात बातमी प्रमाणे एक टाटा विस्टा कार जुना रेणापूर नाका कडून येताना दिसली. त्या कारला सापळयातील पोलीस अंमलदारांनी हात दाखवून थांबविले व कारमधील दोन इसमांना बाहेर बोलावून त्यांचे नाव विचारले. त्यापैकी एकाने सद्दाम बडेसाब शेख (वय 20, रा.सूळ नगर,इंडिया नगर, लातूर), तर दुसऱ्याचे मोहम्मद खलील मोहम्मद हुसेन शेख, (वय 28 , रा.- हुसेन कॉलनी, इंडिया नगर, लातूर) असे नाव सांगितले.
पथकाने त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारचे डॅशबोर्डच्या कप्प्यात एक गावठी पिस्तूल व त्यामधील मॅक्झिनमध्ये चार जिवंत काडतूस व एक पिस्तूलसारखे दिसणारे लाइटर मिळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांनी बाळगलेल्या पिस्तूलच्या परवानाबाबत विचारपूस केली असता त्याने कसल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल आणि नमूद कार पोलिसांनी जप्त केली आहे
आरोपी क्रमांक १ याने त्याच्या इतर साथीदारांसह एमआयडीसी, लातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोकलेन मशीनचे ब्रेकर चोरल्याचे तसेच बार्शी रोडवर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे पोलीस नाईक ब.नं. ९०२ यांच्या फिर्याद वरून एमआयडीसी, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, संपत फड, माधव बिल्लापट्टे , राजू मस्के, नितीन कठारे, जमीर शेख यांनी सहभाग घेतला होता.






