ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : अंबरनाथच्या खुंटवली परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा झाला आहे. या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अंबरनाथच्या खुंटवली परिसरात आशा कराळे यांचं टेलरिंग आणि किराणा दुकान आहे. या दुकानात २६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन सोनसाखळी चोरांनी बिस्कीट घेण्याच्या निमित्ताने जाऊन आशा कराळे यांचं मंगळसूत्र चोरलं होतं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. अरविंद वाळेकर यांचं निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. त्यांच्या घरासमोरच चेन स्नॅचिंग झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान आरोपी प्रकाश उर्फ पिल्ल्या प्रकाश ठमके याला भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी त्याचा ताबा घेत चौकशी केली असता त्याने खुंटवलीतील चेन स्नॅचिंग आपणच केल्याची कबुली दिली. या चोरीसाठी वापरलेल्या टीव्हीएस अँटोरक्यू आणि यामाहा ब्लॅक गोल्ड या गाड्या शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपी आरोपी प्रकाश ठमके याने दिली आहे.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल पार्क हॉटेलमधून पल्सर २२० गाडी चोरल्याची आणि फॉलोवर लेन परिसरात एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुलीही या आरोपीने दिली आहे. आरोपी प्रकाश ठमके याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. त्यात आता या नव्या गुन्ह्यांची भर पडली आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे.






