मित्राचा खून केल्याच्या रागातून गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; दोघा सख्ख्या भावांसह तिघांना अटक

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : मित्राचा खून केल्याचा राग मनामध्ये धरत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड मारून खून करणाऱ्या दोघा सख्ख्या भावडांसह तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासात अटक केली आहे.

सनी सुरेश बारंगळे (वय 31, रा. भोर), अमीर महम्मद मनेर (वय 26) समीर महम्मद मनेर (वय 26 रा. नवीअळी, भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंद सांगळे (रा. धनकवडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. आनंद सांगळे याने 2017 साली आरोपी सनी बारंगळे, अमीर मनेर, समीर मनेर यांच्या मित्राचा खून केला होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होती.

दरम्यान, 3 ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी सनी, अमिर व समीर दारू पीत बसले असताना आनंद आणि त्याचा मित्र त्याठिकाणी गेले. त्यानंतर आनंदने सनीला दारू मागत गोंधळ घातला. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी मिळून आनंदच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. त्यावेळी तिन्ही प्रमुख फरार आरोपी कापूरहोळ पुलाखाली थांबले असून ते बंगळुरूला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, पुनम गुंड यांनी केली आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here