पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपरी चिंचवड महापालिकेतील चौघा नगरसेवकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुलीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत या व्यक्तीने पुण्यातील तब्बल चार नगरसेवकांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र ही फसवणूक असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नाशिकमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पिंपरी चिंचवडमधील चौघा नगरसेवकांची फसवणूक केल्या प्रकरणी सांगवी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुरज वाघ असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आपल्या मुलीचा अपघात झाल्याचा बनाव रचत सुरज ती वायसीएम रुग्णालयात दाखल असल्याचं खोटं सांगत असे. उपचारासाठी पैसे द्या, अशी मागणी त्याने चौघा नगरसेवकांना फोन लावून केली होती. त्यानुसार चार नगरसेवकांनी गुगलपे करत सुरजला पैसे पाठवले होते.
दरम्यान, सांगवीमधील नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर असा अपघात झालेली मुलगी रुग्णालयात नसल्याचे लक्षात आली. त्या विरोधात सांगवी पोलिस स्थानकात त्यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सुरजला नाशिकमधून अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे,पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, साहेब पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,हवालदार चंद्रकांत भिसे,विवेक गायकवाड केंगले,प्रवीण पाटील,विजय मोरे,हेमंत गुट्टीकोंडा,अरुण नराळे यांनी केली.






