पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या एका महिलेला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने तिच्या खात्यातून ३६ हजार ९०० रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्टेट बँकेच्या कोषागार शाखेत आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ एक चोरटा एटीएम केंद्रात शिरला. तेव्हा तक्रारदार महिला एटिएम केंद्रातून पैसे काढत आहे, पण तिला ते काढण्यास जमत नाहीत हे त्याने पाहिले.
चोरट्याने या महिलेला पिन नंबर विचारला आणि तिला मदत करण्याचा बहाणा करून तिच्याकडील डेबिट कार्ड मागून घेतले. काही वेळाने पैसे काढता येत नसल्याचे सांगून चोरट्याने डेबिट कार्डचा गैरवापर केल्याचे महिलेच्या लक्षात आले. चोरट्याने तिच्या खात्यातून ३६ हजार ९०० रुपये काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार या प्रकरणी तपास करत आहेत.






