मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावरच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ८२ लाख रुपयांच्या दारु पकडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद असिफ (23, रा. उत्तर प्रदेश), क्लिनर पवन कुमार माहतो (21, रा. बिहार), जयेश भावसार (25, रा. धुळे ) या तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रायगड हद्दीत ही कारवाई केली. पकडलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीच्या ट्रकमधून विदेशी बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पेण तालुक्यातील मौजे खारडोंबी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील गडब येथील ग्रीन पार्क फॅमिली रेस्टरटसमोर मुंबई पथकाने सापळा रचला. त्यानंतर ट्रकला अडवून पथकाने झाडाझडती घेतली. ट्रकमध्ये १८० मिलीच्या रॉयल ब्लु व्हिस्कीच्या ४८ बाटल्यांनी भरलेले ३८० बॉक्स, १८० मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या ४८ बाटल्यांनी भरलेले ६२० बॉक्स एकूण एक हजार बॉक्स, तीन मोबाईल आणि ट्रकसह ८२ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप याचे आदेशानुसार कोकण उप आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, अशोक तारू, पी एस कांबळे, अमोल चिलगर, धनाजी दळवी, सुभाष रणखांब, अविनाश जाधव, प्रवीण धवणे या पथकाने केली आहे.






